१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा.
अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .
१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ………. यास म्हणता येईल .
( अ ) व्हॉल्टेअर
( ब ) रेने देकार्त
( क ) लिओपोल्ड रांके
( ड ) कार्ल मार्क्स
उत्तर :- आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हाॅल्टेअर यास म्हणता येईल .
२) 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ ……… याने लिहिला .
( अ ) कार्ल मार्क्स
( ब ) मायकेल फुको
( क ) लुसिआँ फेबर
( ड ) व्हॉल्टेअर
उत्तर :- 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला .
( ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा .
( १ ) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी
( २ ) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी अँड पॅक्टिस ऑफ हिस्टरी
( ३ ) हिरोडोटस - द हिस्टरिज्
( ४ ) कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड
उत्तर :-
चुकीची जोड :- कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड
दुरुस्त केलेली जोड :- कार्ल मार्क्स - दास कॅपिटल
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा .
( १ ) द्वंद्ववाद
- उत्तर : एखादया घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो .
- या मांडणीला ' द्वंद्ववाद ' असे म्हणतात . जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली .
- दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धान्तांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते .
- असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही .
- थोडक्यात , दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात .
( २ ) अॅनल्स प्रणाली
- उत्तर : राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक , तत्कालीन हवामान , व्यापार , शेती , तंत्रज्ञान , दळणवळण व संपर्काची साधने , सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले . या विचारप्रणालीलाच ' अॅनल्स प्रणाली ' असे म्हणतात .
- ' अॅनल्स ' ( Annals ) म्हणजे वार्षिक इतिवृत्त . घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे ; तर तत्कालीन सामाजिक , आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे ; असे मानणारी ' अॅनल्स प्रणाली ' फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली .
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा .
( १ ) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले .
- उत्तर : इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता . सीमाँ - द - बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली .
- त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला .
- इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला .
- सीमाँ - द - बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी , ट्रेड युनियन , स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले .
( २ ) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे .
- उत्तर : मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली .
- त्यांच्या मते , अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे , हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे , म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो .
- फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला ; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ ज्ञानाचे पुरातत्त्व ' असे म्हटले आहे .
४. पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा .
( १ ) इतिहासलेखन म्हणजे काय ?
- उत्तर : इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो :-
- उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे .
- त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे .
- उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे . या पद्धतीने केलेल्या लेखनपद्धतीला ' इतिहासलेखन ' असे म्हणतात .
( २ ) रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला ?
- उत्तर : फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात पुढील मताचा आग्रह धरला :-
- एखादी गोष्ट सत्य आहे , असे नि : संशयरीत्या निश्चित होत नाही , तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये .
- एखादया समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत .
- इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे .
( ३ ) व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते ?
- उत्तर : व्हॉल्टेअरच्या मते , इतिहासलेखनासाठी -
- वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा .
- तत्कालीन समाजाच्या परंपरा , शेती , व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे .
- या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा , हा नवीन विचार पुढे आला . म्हणून व्हॉल्टेअर याला ' आधुनिक इतिहासलेखनाचे जनक ' असे म्हटले जाते .
५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा .
( १ ) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा .
- उत्तर : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने ' वर्गसंघर्षाचा सिद्धांत ' मांडला . त्याच्या मते -
- इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो .
- मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलबून असतात .
- समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत . उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो .
- उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो . मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे .
( २ ) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?
- उत्तर : आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये -
- या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते .
- हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात . त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा - कहाण्यांशी जोडलेला नसतो .
- या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते .
- मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो .
( ३ ) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?
- उत्तर : स्त्रीवादी इतिहासलेखन स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय .
- इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता . म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा , अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ - द - बोव्हा हिने मांडली .
- त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला .
- स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या , रोजगार , ट्रेड युनियन्स , स्त्रियांचे कौटुंबिक जीवन , स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले .
- १९९० नंतर ' स्त्री ' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला . या दृष्टिकोनालाच ' स्त्रीवादी इतिहासलेखन ' असे म्हणतात .
( ४ ) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा .
- उत्तर : लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहासलेखन कसे करावे , याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो . त्यांच्या मते
- इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे .
- इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे . या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते .
- इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी .
- जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दयायला हवा .
Comments
Post a Comment